पिंपरी: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू संजोग वाघेरे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. ते लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संजोग वाघेरे हे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आणि माजी शहराध्यक्ष राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघोरे उद्धव ठाकरेंच्या गोटात जाण्याची शक्यता आहे, हा अजित पवारांना पिंपरीत मोठा धक्का आहे. वाघोरे यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. त्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कुणाची भेट घ्यायची, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, त्यामुळे आमच्याकडील लोकांना घेण्याची धडपड करत असल्याची खोचक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
वाघेरे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट
पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. येथील माजी महापौर संजोग वाघेरे यांनी सोमवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर आणि माजी शहराध्यक्ष होते. मावळ लोकसभा निवडणूक लढवायची त्यांची इच्छा आहे. महायुतीत त्या जागेसाठी निर्माण झालेली चुरस पाहता, त्यांना महायुतीतून तिकीट मिळण्याची शक्यता फारचं कमी आहे. त्यामुळं ते महाविकास आघाडीतून तिकीट मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी मावळ लोकसभेच्या तिकिटाबाबत त्यांनी चर्चा केली. ठाकरेंनी वाघोरे यांना तिकीट देण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा आहे. संजोग वाघेरे लवकरच शिवबंधन बांधणार आहेत. तूर्तास तरी वाघेरेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केलेला नाही. पुढील दोन दिवसांत ते पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे.