पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी काढलेल्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ची सांगता सभा पुण्यात झाली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत खासदार, खासदार सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना चांगलंच लक्ष्य केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘शिरूरमधून उमेदवार निवडून आणणारच’ असा निर्धार व्यक्त करत खासदार अमोल कोल्हेंना आव्हान दिलं होतं. या विधानाचा धागा पकडून खासदार संजय राऊतांनी अजित पवारांना इशारा दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, “मी एक वक्तव्य ऐकलं, ‘काहीही झाले तरी मी तुम्हाला पाडणारच. पण, आमच्या पाडा पाडीच्या खेळात पडला, तर पहिले तुम्ही पडाल. नाव घेऊन बोलायचं असतं, आमच्यात दम आहे. ‘हवा बोहोत तेज चल रही है, अजितराव… टोपी उड जायेगी.” असंही राऊत म्हणाले.
“शेतकऱ्यांचे पाच, सहा प्रश्न घेऊन खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेले असते, तर त्यांनी ‘रामलल्लाचे दर्शन मोफत करून देऊ’, असं सांगितलं असतं. दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार होते. पण, त्यावरही ‘रामलल्लाचे दर्शन मोफत घडवू,’ हेच उत्तर आहे,” असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर थेट हल्लाबोल केला आहे.