Sangli News : सांगली : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या (Murder) प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड याचा आज सांगलीत मृत्यू झाला. प्रकृती बिघडल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्याचे निधन झाले असावे. या घटनेनंतर पानसरे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर गायकवाडची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींपैकी तो एक महत्त्वाचा संशयित होता आणि या खटल्याची सुनावणी अद्याप सुरू होती.

कॉ. गोविंद पानसरे यांची 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या तपास प्रकरणादरम्यान समीर गायकवाडला पोलिसांनी अटक केली होती. काही काळ तुरुंगात राहिल्यानंतर तो जामिनावर बाहेर होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत आता पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणाच्या तपासानंतर सप्टेंबर 2015 मध्ये समीर गायकवाडला सांगलीतून अटक करण्यात आली होती. त्याने काही काळ तुरुंगात काढला. त्यानंतर न्यायालयाने त्याला जामिनावर मुक्त केले होते. सध्या तो जामिनावर बाहेर असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.
पानसरे हत्या प्रकरणाचा खटला अद्याप न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाचा संशयित आरोपी मृत्युमुखी पडल्याने पुढील कायदेशीर प्रक्रियेवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.






