मुबंई : मीरा-भाईंदर शहराला ‘जैन नगरी’ असे संबोधल्याने निर्माण झालेल्या वादानंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आपले स्पष्टीकरण सादर केले आहे. जैन समाजाच्या एका धार्मिक-सामाजिक कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हे विधान केले होते. या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर, तो कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता असे स्पष्ट करत कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी जाहीर माफी मागितली आहे.

मीरा-भाईंदर हे मूळचे आगरी-कोळी बांधवांच्या वस्त्यांतून वसलेले शहर असून, आज तेथे सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. या भागात जैन समाजाची लोकसंख्या मोठी असल्याने मी सहज तो उल्लेख केला होता, असा दावा मेहता यांनी केला. शहरात सत्तेत असताना विविध घटकांच्या मागणीनुसार विकासकामे केल्याचे त्यांनी नमूद केले.कोणत्याही समाजाला दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असे मेहता यांनी म्हटले आहे.

शहर विकासाशी संबंधित मुद्द्यांवर बोलताना त्यांनी सूर्या धरणातून पाणी पुरवठा करण्याचा प्रकल्प 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. यासोबतच विजेचे पोल आणि इतर तांत्रिक कामांच्या मंजुरीच्या विषयावरही काम सुरू असल्याचे स्पष्ट केले.

कत्तलखान्यांच्या बंदीबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, जैन आणि कॅथलिक अशा दोन्ही समाजांकडून याला विरोध करण्याची मागणी आली होती. त्यामुळे नागरिकांच्या इच्छेचा आदर करत हा निर्णय घेण्यात आला होता.
शाळांमधील कांदा-लसूण आणि कंदमुळांच्या वापराबाबत झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले. हा नियम गेल्या 30 वर्षांपासून चालत आला असून, विद्यार्थ्यांवर कोणतेही सक्तीचे बंधन लादलेले नाही. केवळ सांस्कृतिक धार्मिक भावना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपापले डबे एकमेकांसोबत शेअर करू नयेत, अशी साधी विनंती करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.







