मुंबई : नागरिकांना शुद्ध व भेसळमुक्त दूध मिळावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, धारावी, अँटॉप हिल आणि माहीम परिसरातील अनेक दूध केंद्रांवर अचानक तपासणी मोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये अन्न सुरक्षा नियमांचे मोठे उल्लंघन समोर आले आहे.

तपासणीदरम्यान निकृष्ट दर्जाचे आणि संशयास्पद आढळलेले एकूण 564 लिटर दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. मानखुर्द येथील महाराणा डेअरीमधून 40 लिटर आणि गोवंडीच्या साईनाथ डेअरीमधून 45 लिटर सुटे दूध जप्त करून नष्ट केले गेले. तसेच, अँटॉप हिलमधील सागर मिल्क सेंटर येथे साठवणुकीचे नियम न पाळल्याने 11 हजार 625 रुपये किमतीचे 250 लिटर दूध पंचनाम्यानंतर नष्ट करण्यात आले. धारावीतील शक्ती डेअरी आणि माहीमच्या राहुल मिल्क सेंटरमधून अनुक्रमे 31 आण 198लिटर कच्चे सुटे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले आहे.

या कारवाईत अनेक दुकाने विनापरवाना सुरू असल्याचे किंवा अन्न सुरक्षेच्या ‘शेड्युल 4’ नियमांचे पालन करत नसल्याचे स्पष्ट झाले. मानखुर्दच्या अगस्ती मिल्क एजन्सीसह अनेक आस्थापनांमध्ये योग्य स्वच्छता राखली जात नव्हती. या सर्व दोषी दूध विक्रेत्यांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्याची कायदेशीर प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याची गय केली जाणार नाही. दुधाची गुणवत्ता, योग्य साठवणूक आणि स्वच्छतेची तपासणी करण्यासाठी अशा मोहिमा यापुढेही राज्यभर अधिक तीव्रतेने सुरूच राहणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.






