आदित्य बोराटे –

इंदापूर : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने इंदापूर येथे मूक मोर्चा व निषेध सभा घेण्यात आली. या वेळी ‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’, ‘कन्येला न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या घटनेबाबत सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून सरकारला श्रद्धांजली अर्पण केली.

नाभिक महामंडळाच्या वतीने देण्यात आलेले निवेदन नायब तहसीलदार स्वाती राऊत यांनी स्वीकारले. या निवेदनातून संबंधित घटनेची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी तसेच महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

या निषेध सभेदरम्यान उपस्थित समाजबांधवांनी घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. पीडित कन्येला न्याय मिळालाच पाहिजे, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासन व प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. त्यांनी उपस्थित नाभिक समाजबांधवांशी संवाद साधत घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला तसेच संबंधित आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केल्याचे उपस्थितांनी सांगितले.यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पदाधिकारी, समाजबांधव, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







