उत्तर प्रदेश : मऊ जिल्ह्यातून एक अजब आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील दोहरीघाट परिसरातील सरयू नदीकाठच्या स्मशानभूमीजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो आढळून आला. विशेष म्हणजे या फोटोच्या बाजूला नारळ, लिंबू, लाल धागा, शेंदूर आणि सुया रोवलेल्या काही वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. या साहित्यावरून हा प्रकार जादूटोणा किंवा काळ्या जादूचा असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल झालेल्या दृश्यांमध्ये एका लिंबात मुद्दाम सुई खुपसलेली दिसत असून फोटोच्या भोवती तंत्रमंत्राशी संबंधित साहित्य मांडलेले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रकरण थेट देशाच्या पंतप्रधानांशी जोडलेले असल्याने प्रशासनाने तात्काळ पावले उचलत घटनेची गंभीर दखल घेतली आहे .

दोहरीघाट पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली असून लवकरच संशयिताचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.दरम्यान, या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून भाजपचे जिल्हाध्यक्ष रामाश्रय मौर्य यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. समाजात अशांतता आणि अराजकता पसरवण्याच्या हेतूनेच हे कृत्य करण्यात आले असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत असून, व्हिडिओची सत्यता पडताळण्याचे कामही सुरू आहे.






