पुणे : पुण्यातील टिंबर मार्केट परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विजयवल्लभ शाळेच्या आसपास असलेल्या लाकूड आणि इतर साहित्याच्या दुकानांना रात्री 2 वाजता अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण केले आणि एकामागोमाग एक अशी जवळपास 60 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. लाकडी सामान असल्यामुळे आगीचा भडका मोठ्या प्रमाणावर उडाला होता.

आगीची ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. शेजारीच असलेल्या वस्तीतील काही घरांनाही या आगीची झळ बसली असून अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. आपल्या डोळ्यादेखत कष्टाने उभे केलेले विश्व जळून खाक होताना पाहून स्थानिक नागरिकांना अश्रू अनावर झाले. सुदैवाने, आग लागल्याचे लक्षात येताच रहिवासी तातडीने घराबाहेर पळाले. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 30 बंब आणि 150 जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता इतकी जास्त होती की तब्बल 4 तासांच्या अथक परिश्रमानंतर जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या बचावकार्यात स्थानिक नागरिकांनीही मोठी मदत केली. पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून जवळच्या नाल्यातून पंपाद्वारे पाणी उपसून आगीवर मारण्यात आले, तसेच अनेक खासगी टँकरही मागवण्यात आले होते. सध्या आग नियंत्रणात असली तरी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

गेल्या 8 वर्षांत टिंबर मार्केटमध्ये आग लागण्याची ही तिसरी वेळ आहे. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले असून नेमकी किती दुकाने जळाली याची मोजदाद सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास पोलीस आणि अग्निशमन दल करत आहेत. दोन तरुणांच्या गटातील वादातून जाळपोळ होऊन ही आग भडकली असावी का, या दिशेनेही पोलीस कसून चौकशी करत आहेत.






