पुणे: पुण्यातील आळंदी रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यामुळे भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत रिक्षामधून प्रवास करणाऱ्या 51 वर्षीय महिला सफाई कामगाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित पोलीस कर्मचारी फरार झाला होता. तब्बल 24 तासांहून अधिक काळ फरार राहिल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विशाल इथापे असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 4 मध्ये कार्यरत आहे. या अपघातात संगीता अनिल साठे (वय 51, रा. येरवडा) यांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी ईश्वर येदू वाघमारे (वय 65) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी संगीता साठे रिक्षातून कामासाठी जात होत्या. त्यांची रिक्षा मेंटल कॉर्नर चौकातून जात असताना विशाल इथापे याच्या भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत साठे गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर इथापे याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजल्यानंतर तो तेथून निघून गेल्याचा आरोप आहे.

त्यानंतर संगीता साठे यांना मोठ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि अखेर त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, अपघातावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता का, याबाबत पोलिसांना संशय आहे. या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली. अपघाताची नेमकी कारणे आणि इतर बाबींचा पोलीस तपास करत आहेत.






