पुणे: डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक आणि शहरातील मध्यवर्ती पेठांना जोडण्यासाठी मुठा नदीवरील भिडे पुलावर पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या बांधकामासाठी भिडे पूल तब्बल दीड महिन्यापर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे डेक्कन, नारायण पेठ, शनिवार पेठ आणि परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

गुरुवार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 31 डिसेंबरपर्यंत हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पादचारी पुलाच्या कामासाठी मोठ्या आणि अवजड साहित्याची वाहतूक केली जाणार आहे. हे साहित्य पुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांसाठी तसेच नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यापूर्वीही या कामासाठी भिडे पूल बंद करण्यात आला होता. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती पुण्यात वाहतूककोंडी वाढली होती. परिणामी, दिवसा पूल वाहतुकीसाठी खुला ठेवून रात्रीच्या वेळी बांधकाम केले जात होते. त्यामुळे कामाचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढत नव्हता. आता काम लवकर पूर्ण करण्यासाठी पूल पूर्ण कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, भिडे पूल बंद असताना नागरिकांना लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिज या पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे. नदीपात्रातील रस्ता मात्र वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.
या नवीन पादचारी पुलामुळे डेक्कन मेट्रो स्थानकातून नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता परिसरात जाणे सोयीचे होणार आहे.






