पुणे : शेतीचा वाढता खर्च, मजुरांची टंचाई आणि बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतीची कामे कमी वेळेत आणि कमी खर्चात पूर्ण करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना फायदेशीर ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील 5,795 शेतकऱ्यांना आतापर्यंत 65 कोटी 11 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे.

ट्रॅक्टर आणि कृषी अवजारांसाठी मोठी मदत
शेतीची मशागत, पेरणी, फवारणी आणि पीक काढणी ही कामे वेळेत होणे आवश्यक असते. आधुनिक यंत्रांच्या मदतीने ही कामे कमी श्रमात पूर्ण करता येतात. आतापर्यंत जिल्ह्यातील 1,889 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, 364 जणांना पॉवर टिलर आणि 2,902 शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्रे व अवजारांसाठी अनुदान मिळाले आहे. याशिवाय 600 कृषी अवजारे बँका आणि 27 कंबाईन हार्वेस्टरधारकांनाही मदत देण्यात आली आहे.
ट्रॅक्टर, नांगर, कल्टिव्हेटर, फवारणी यंत्र, चाफ कटर आणि पेरणी यंत्रांसारख्या साधनांमुळे शेतीची कामे अधिक सोपी होत आहेत. पॉवर टिलरचा उपयोग ऊस पिकाची बांधणी, फळबागांची मशागत आणि तण नियंत्रणासाठी केला जातो.

कृषी अवजारे बँकांना 24 कोटींचे अनुदान
कृषी अवजारे बँक योजनेतून 600 बँकांना एकूण 24 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. या योजनेत 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतची यंत्रसामग्री खरेदी करता येते. त्यासाठी 4 ते 10 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेनुसार आधुनिक यंत्रे वापरणे शक्य होणार आहे.
किसान ड्रोन योजनेतून 13 शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी 57 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. ड्रोनच्या साहाय्याने पिके आणि फळबागांमध्ये फवारणी करणे सोपे होते. तसेच कंबाईन हार्वेस्टरमुळे गहू, हरभरा, सोयाबीन आणि मका यांसारख्या पिकांची काढणी कमी वेळेत करता येते.
शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.







