Solapur News: सोलापूर : सोलापूर शहरात इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुनी पोलीस लाईन परिसरात एका खासगी शाळेसमोर हा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक पालक आपल्या तीन वर्षांच्या मुलीला शाळेतून घेऊन जाण्यासाठी इलेक्ट्रिक दुचाकीवर आले होते. मुलीला घेऊन परत जात असताना जुनी पोलीस लाईन परिसरात त्यांच्या दुचाकीतून अचानक धूर निघू लागला. सुरुवातीला हे लक्षात न आल्याने ते गाडी चालवतच होते. मात्र त्यांच्या मागून येणाऱ्या एका महिलेच्या हे लक्षात आले. तिने तात्काळ आरडाओरडा करत पालकांना गाडी थांबवण्याचा इशारा दिला.

पालकांनी तात्काळ गाडी थांबवली असता काही क्षणांतच दुचाकीला आग लागल्याचे दिसून आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी कोणताही विलंब न करता आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीला उचलून सुरक्षित अंतरावर नेले. यानंतर काही वेळातच दुचाकीने पूर्णपणे पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन पाणी टाकत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

या घटनेदरम्यान उपस्थित नागरिकांमध्ये मोठी धावपळ उडाली होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जर काही मिनिटांचा उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडू शकला असता. सुदैवाने पालकांची सतर्कता आणि नागरिकांची मदत यामुळे चिमुकलीचा जीव वाचला.
या घटनेनंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून अशा वाहनांची नियमित तपासणी आणि खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.







