पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणार असल्याचे ओपन चॅलेंज दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजितदादांच्या या चॅलेंजवर खासदार अमोल कोल्हे यांनी मौन सोडले आहे. अजितदादांनी संघर्ष यात्रांची खिल्ली उडवली, हे दुर्दैवी आहे. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. दुधाबाबत काय परिस्थिती आहे, हे अजितदादांना माहीतच आहे. आम्ही शेतकऱ्यांचे म्हणणे मांडत असू तर दादांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे. ते सरकारमध्ये आहेत. केंद्र सरकारकडे कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी आमच्या सूरात सूर मिसळून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. अजित दादांच्या वयाचा, नेतृत्वाचा, ज्येष्ठतेचा मी सन्मान करतो. राजकराणाबाबत माझ्या काळजात दादांसाठी वेगळी जागा आहे, तो खास कप्पा कायम राहील.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. मी या मतदारसंघाचा खासदार आहे. या भागाच्या विकासासाठी माझी लढाई सुरू आहे. मी माझ्या मतदारसंघात पाच वर्षांपासून काम करत आहे. मतदारसंघात विकासकामे केली आहेत. निवडणूक म्हणजे प्रतिनिधीत्व करण्याची बाब आहे. एकमेकांना आव्हान देण्याची बाब नाही. दादा हे मोठे नेते आहेत. त्यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर द्यायला मी मोठा नाही. भविष्यात पक्षाने मला तिकीट दिले तर शंभर टक्के लढणार आहे. शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
या वेळी बोलताना अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, अजितदादा मोठे आहेत. शिरूरमध्ये माझ्या कामाचं त्यांनी जाहीर भाषणात कौतुक केलं आहे. संसदेतील परफॉर्मन्सचं कौतुक केलं आहे. त्यामुळे ते आता काय म्हणाले हे समजून घ्यावं लागेल. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला ते आव्हान देतील असं वाटत नाही.
कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. शेतकरी संतापलेले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान किती होते, ही गोष्ट अजितदादांना माहीत असेल. दुधाची स्थिती देखील त्यांना माहीत असेल. आम्ही हा विषय घेऊन पुढे जात असू, शेतकऱ्यांचे मत मांडत असू तर दादांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे. ते सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारकडे कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी आमच्या सूरात सूर मिसळून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलले पाहिजे, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले.
अजित दादा हे मोठे नेते आहेत. कायम त्यांच्या वयाचा, नेतृत्वाचा, ज्येष्ठतेचा आणि राजकराणात दादांची जागा माझ्या काळजात वेगळी जागा आहे. खास कप्पा आहे तो कायम राहील. माझ्या परीने मी ठामपणे सांगू शकतो. नाराजी बोलली जात होती. निष्ठा राखली. हे सगळं घडून आलं नाही म्हणून टार्गेट केलं जातं का?” असा सवालही अमोल कोल्हेंनी उपस्थित केला.