उरुळी कांचन, (पुणे) : आपल्या मुलांचा वाढदिवस आप्तस्वकीयांमध्ये साजरा करणारे शेकडो कुटुंबे नजरेस पडतात. मात्र, जिल्हा परिषद शाळेतील मुलांसोबत वाढदिवसाचा आनंद ‘शेअर’करणारे कुटुंब क्वचितच पाहायला मिळतात. भवरापूर येथील उद्योजक संजय साठे व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मुलीचा समीक्षाचा वाढदिवस भवरापूर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांसोबत साजरा करून नवा आदर्श निर्माण केला. मागील अनेक वर्षांपासून साठे कुटुंबीय हा उपक्रम राबवित आहेत.
सर्वसामान्यांप्रमाणे ते हा आनंद नातेवाईकांच्या गोतावळ्यात साजरा करू शकले असते. परंतु, त्यांनी तसे न करता जिल्हा परिषद शाळेतील मुलांमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुलांसाठीही खाऊ व एक नामांकित कंपनीची पाण्याची बॉटल मुलांना गिफ्ट म्हणून दिल्या. भविष्यातही अशाप्रकारची सामाजिक बांधिलकी जपण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.
समीक्षा साठे हि लोणी काळभोर येथील एम. आय. टी. या शिक्षण संस्थेत शिक्षण घेते. तिचा काल सोमवारी (ता. 22) जुलै रोजी वाढदिवस होता. आपला वाढदिवस जिल्हा परिषद शाळेतील मुलांसोबत साजरा करण्याचे ठरवले. एम आय टी या शिक्षण संस्थेत सर्वजण सदन घरातील असतात आणि जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुले आपल्यासारखी सामान्य असतात. वाढदिवसानिमित्त त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचे असते आणि ते गिफ्ट गरजू मुला मुलींना मिळावे अशी खूप इच्छा होती. त्यामुळे हा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेत साजरा केला.
यावेळी उद्योजक व भवरापूरचे माजी सरपंच सुभाष साठे, माजी सरपंच बबनराव साठे, शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण लवांडे , शिक्षिका संध्या कुंभार, ज्येष्ठ नागरिक सदाशिव साठे, उत्तमराव साठे, उद्योजक संजय साठे, संभाजी साठे, गौरव साठे, तेजस साठे, ग्रामसेवक ताम्हाणे आदि मान्यवर उपस्थित होते.
याबाबत बोलताना समीक्षा साठे म्हणाली, “जिल्हा परिषद शाळेतील मुलांना गिफ्ट दिल्यामुळे मुलांनाही खूप आंनद होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून कुटुंबियांना व मला खूप आनंद होतो. भविष्यात ही अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याच्या निर्णय घेतला असून, प्रत्येक वाढदिवस याच मुलांसोबत साजरा करणार आहे.
दरम्यान, गावातील प्रत्येकाने आपला वाढदिवस आपल्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांसोबत करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळं या मुलांना छोटसं गिफ्ट मिळते आणि मुलांमध्ये शाळेबद्दल आवड निर्माण होते. असे मत मुख्याध्यापक लवांडे यांनी व्यक्त केले. तर शाळेतील छोट्या मुलांनी सुध्दा समीक्षाला शुभेच्छा दिल्या. आभार शिक्षिका कुंभार यांनी मानले.