पुणे : पुण्यातील रविवार पेठेतील प्रसिद्ध सोनिग्रा ज्वेलर्स यांची त्यांच्याच दुकानामध्ये काम करणाऱ्या सेल्समनने कोट्यवधी रुपयांची अफरातफर करत फसवणूक केली आहे. विक्रम बाफणा असे संशयित सेल्समनचे नाव असून, तो फरार झाला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, फसवणुकीच्या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सेल्समन विक्रम बाफणा (मूळ रा. मुंबई) सोनिग्रा यांच्याच फॅक्टरीत जुलै २०२३ पासून वास्तव्याला होता. तो राजरोसपणे सोन्याची विक्री करून हिशोब सोनिग्रा ज्वेलर्स यांच्याकडे देत होता. त्याने गोड बोलून मालकाचा विश्वास संपादन केला होता.
दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी २४५ नग सोन्याची चैन (किंमत १ कोटी १५ लाख रूपये) विक्रीची ऑर्डर आहे असे सांगून तो ऑर्डर घेऊन गेला व परत आलाच नाही. सेल्समन न आल्यामुळे सोनिग्रा यांना फसवणूक झाल्याचा संशय आला. त्यानंतर सोनिग्रा यांनी तत्काळ फरासखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध तक्रार नोंदविली आहे.
याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात आरोपी विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे करीत आहेत. फरार सेल्समनचा फरासखाना पोलीसांकडून शोध सुरू आहे.