पुणे : औषध विक्री परवाना नसताना, औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण नसताना, केवळ नशा करण्याच्या उद्देशाने हडपसर, माळवाडी परिसरात बेकायदेशिरपणे मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) इंन्जेक्शनची विक्री करणाऱ्यास हडपसर तपास पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपीच्या ताब्यातील मॅफेनटरमाइन सल्फेटच्या इंजेक्शनच्या ३० बाटल्या व एक मोटारसायकल असा ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी किरण विठ्ठल शिंदे (वय २१, रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, तिसरा मजला, स्वामीनारायण मंदिरामागे, भुमकर मळा, नन्हे गाव, सिंहगड रोड, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोमवारी (ता. ८) पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी जावून संशयित आरोपी किरण विठ्ठल शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये मॅफेनटरमाइन सल्फेटच्या इंजेक्शनच्या बाटल्या आढळल्या. चौकशी केली असता, हे औषध नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन ५५० रुपयांना विक्री करत असल्याचे त्याने कबूल केले. आरोपीच्या ताब्यातील सल्फेटच्या इंजेक्शनच्या ३० बाटल्या व एक मोटारसायकल असा ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीकडे औषध विक्री परवाना नसताना, औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसताना तसेच हे औषध केमिकल असून, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास व व्यक्तीला टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होवून, औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होवू शकते हे माहित असताना सुद्धा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या या इंजेक्शनची विक्री करण्यात आली. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कदळे हे करीत आहेत.