पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारत नसून सरकारने दिलेली आश्वासन पाळली जात नाहीत. काही दिवसापूर्वीच एसटी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्या काळात वेतनाची पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन देण्याचे सरकारने न्यायालयात मान्य केले होते.
पण यंदा डिसेंबर महिन्याची १० तारीख उलटून गेली तरी कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन न मिळाल्याने सरकारने न्यायालयात दिलेल्या हमीपत्राबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. वर्षानुवर्षे दर महिन्याच्या ७ तारखेला एसटी कमचाऱ्यांना वेतन मिळत आहे. त्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या प्रतिपूर्तीपोटी शासनाकडून एसटी महामंडळाला ३२९. ९४ कोटी इतका निधी वितरित झाला आहे.
मात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात अद्याप मासिक वेतन वर्ग करण्यात आलेले नाही. दरम्यान, वेतन वेळेत मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून या विषयावर एसटी महामंडळ अजिबात गंभीर नसल्याचा आरोप एसटी संघटनांकडून करण्यात येत आहे.
उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीच्या समितीची शिफराशीनुसार कारवाई होत नाही. या समितीने कर्मचाऱ्यांचे पगार 7 ते 10 तारखेदरम्यान करण्यास सांगितले होते. परंतु आता दहा तारीख गेली तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाही. यामुळे सर्व कर्मचारी हवालदिल झाले आहेत. नोव्हेंबर महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले नसल्यामुळे घरखर्च कसा चालवावा, ही अडचण त्यांच्या कुटुंबियांसमोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा कर्मचारी एसटी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहे.