गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यामध्ये उसाला ऊसतोडी मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. मागील वर्षी भिमा सहकारी साखर कारखाना चालू झाल्यामुळे यावर्षी ऊस तोडणी मजूर वाढतील, अशी अपेक्षा होती. परंतु तालुक्यात कारखान्याच्या टोळ्या मर्यादित आल्या आहेत. शेतकरी आपल्याला ऊसतोडी मिळावी म्हणून शेतकी कार्यालयात जाऊन अधिकार्यांना ‘साहेब आम्हाला टोळी कधी मिळणार’, अशी विनवणी करू लागले आहेत.
दौंड तालुक्यामध्ये दौंड शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज शुगरसह निराणी ग्रूपचा भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना आदी कारखान्यांच्या ऊस टोळ्या व हार्वेस्टर ऊस तोडणीसाठी आले आहेत. या भागातील अनेक शेतकर्यांनी इतर साखर कारखान्यांमध्ये आपल्या उसाची नोंद केली आहे. परंतु, ऊस टोळ्या कमी असल्याचे शेतकी अधिकार्यांकडून शेतकर्यांना सांगितले जात आहे. वेळेत उसाचे गाळप झाले नाही, तर उसाच्या वजनामध्ये घट होत आहे. शेतकर्यांना त्याचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
घोडगंगा साखर कारखाना चालू झाला असता, तर ऊसतोडीसाठी येथील शेतकर्यांना आणखी थोडी मदत झाली असती. कारखान्यांच्या मागे पळावे लागले नसते. ऊस वेळेवर तोडल्यावर शेतकर्यांना फायदाच झाला असता. परंतु, ऊस वेळेत तोडला जात नाही. परिणामी, जास्त बाजारभाव मिळूनही शेतकर्यांचे नुकसान होत आहे.
दरम्यान, सध्या ऊसतोड मजुरांची संख्या कमी आहे. हार्वेस्टर मशिन शेतात जात नाही, अशी अनेक कारणे सांगून शेतकर्यांची दिशाभूल होत आहे. सहकारी आणि खासगी कारखान्यांचे पदाधिकारी शेतकर्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. कोणता कारखाना याकडे लक्ष देणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.