पुणे : झोमॅटोची डिलीव्हरी करणार्या पिता-पुत्रास मारहाण करून लुटणार्या तीन जणांना सहकारनगर पोलिसांनी अवघ्या 48 तासांत अटक केली आहे. अविष्कार उर्फ अव्या अशोक दिघे (22, रा. गुलाबनगर, धनकवडी), शंतनु मारूती लोहार (18, रा. दुर्वांकुर सोसायटी, प्रभात चौक, धनकवडी), मंगेश उर्फ मंग्या हनुमंत चौरे (21, रा. नवनाथ नगर, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार हनुमंत कुंभारी (22, रा. धनकवडी) हे त्यांच्या वडिलांसह झोमॅटो कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणुन काम करतात. 9 फेब्रुवारीला मध्यरात्री साडेबारा वाजता ओंकार कुंभारी हे त्यांच्या वडिलांसह धनकवडीमधील नवनाथनगर येथे बर्गरची डिलीव्हरी करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपींना त्यांना तंबाखु मागण्याचे नाटक केले. त्यानंतर त्यांनी लाईटच्या टयुबने त्यांना मारहाण करून कुंभारी यांच्याकडील मोबाईल चोरी करून नेला. याबाबत 10 फेब्रुवारीला ओंकार यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सी.बी. बेरड, तपास पथकातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापु खुटवड आणि पोलिस अंमलदार महेश मंलीक व सागर कुंभार हे आरोपींच्या मागावर होते. त्यावेळी त्यांना आरोपीं हे कात्रजकडून नवले पुलाकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्हा करताना वापरलेली वाहने आणि ओंकारचा मोबाईल असा एकुण 1 लाख 17 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश नलावडे करीत आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील, डीसीपी स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त नंदीनी वग्यानी, वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सी.बी. बेरड, एएसआय बापु खुटवड, पोलिस हवालदार बजरंग पवार, संजय गायकवाड, अमोल पवार, निलेश शिवतरे, पोलिस अंमलदार महेश मंडलीक, नवनाथ शिंदे, सागर कुंभार, सागर सुतकर आणि विशाल वाघ यांच्या पथकाने केली .