बारामती : आज काहीजण म्हणत आहेत याने काय संघर्ष केला. मला सत्तेत जाणं सोपं होतं, पण मी गेलो नाही. माझा व्यवसाय अडचणीत होता मी बाहेर काढला. आज मला बँका लोन देत नाहीत. अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भूमिका बदलायची नसती. पक्ष फोडायला अटी लावत नाहीत पण शेतकऱ्यांना अनुदान द्यायला अटी लावता, असं आमदार रोहित पवार म्हणाले आहेत. ते बारामती येथील सभेत बोलत होते.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, लहान मुले म्हणतात की, पणजोबाला सोडायच नाही, जर सोडलं तर आम्ही बोलणार नाही. हे मुलाला कळतं. मला काही जण बच्चा म्हणतात, पण मला एवढं कळत की वडीलधाऱ्यांना सोडायचं नाही. काही जण म्हणतात मला कुणाची जागा घ्यायची आहे. पण मला कुणाची जागा घ्यायची नाही. होलसेलमध्ये इथे पक्षाची चोरी झाली आहे, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.
पवार म्हणाले, आज दुधाचे दर कमी झाले आहेत. साहेब ज्यावेळी सत्तेत होते त्यावेळी मार्ग नक्कीच काढायचे. परिस्थिती कोणतीही असो शरद पवार मार्ग काढतातच. साहेबांनी बारामतीचा विकास केला म्हणून बारामती पुढे गेली. साहेबांचा स्वभाव बदलला नाही, आहे तसेच साहेब आहेत. जसे बोलले तसे वागले. आता काही लोकांनी भूमिका घेतली आहे.
ही किरकोळ नाही, तर होलसेल चोरी : शरद पवार
राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह, झेंडा सर्व काही चोरी झाली. ही किरकोळ नाही, तर होलसेल चोरी झाली. सगळ्या देशाला माहिती आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणी स्थापन केला. जे लोक पक्ष, चिन्ह घेऊन गेले त्यांनी कोणाच्या नावाने झेंड्याने मागील निवडणुकीत मते मागितली. सगळं घेऊन ही मंडळी गेली,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.