पुणे : एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात कोयते आणि बंदूकीचा धाक दाखवून मद्य विक्री दुकानात दरोडा घालून, तीन लाख रुपयांची रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. १९) घडली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या गुन्ह्यातील चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदारास अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पिस्तूल, तलवार आणि ३२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मनोज बाळासाहेब मोरे (वय ३३, रा. कृष्णा रेसीडन्सी, कोंढवे धावडे) यांनी फिर्याद दिल्यानुसार, तेजस राहुल पिंपळगावकर (वय १९, रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी चार अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असून, अल्पवयीन मुलांविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत.
विश्वचषकाच्या सामन्याची रंगत रविवारी (ता. १९) रात्री सर्वत्र सुरू होती. त्याचवेळी एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरातील अहिर गेटजवळ मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या आर. आर. वाइन्स दुकानात दरोडा टाकण्यात आला. यामध्ये सहा जण होते. त्यात दोघांनी तलवारी हातात घेऊन दहशत माजवली.
दुचाकीवरुन आलेल्या या आरोपींकडे पिस्तूल, कोयता, तलवारी अशी शस्त्रे होती. चोरट्यांनी तलवार, कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील रोकड काढून घेतली. दुकानातील मद्याच्या बाटल्या पिशवीत भरल्या. दुकानातील कामगार आणि ग्राहकांना जीवे मारण्याची धमकी देऊन चोरटे भरधाव वेगााने दुचाकीवरुन पसार झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींच्या शोधासाठी उत्तमनगर, सिंहगड रस्ता पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपासावरून पोलिसांनी सिंहगड रस्त्त्यावरील माणिकबाग भागातून आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडून पिस्तुलासह रोकड जप्त करण्यात आली आहे. सहायक पोलीस आयुक्त भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, सहायक निरीक्षक दादाराजे पवार, उमेश रोकडे, समीर पवार, तुषार किंद्रे आदींनी ही कामगिरी केली.