लोणी काळभोर : रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी रस्ता सुरक्षा जागरूकता मोहिमेअंतर्गत सोमवारी सकाळी एकत्र आले होते. हेल्मेट घालणे, सीटबेल्ट लावणे, वाहतूक नियमांचे पालन करणे आणि रहदारीचे नियम पाळणे यासह स्वसुरक्षेसाठी आवश्यक गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील अश्वारूढ पुतळ्याला पुषार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे सहयोगी संचालक प्रा. डॉ. सुराज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात अनेक प्राध्यापक वृंद सहभागी झाले होते. या वेळी बोलताना डॉ. भोयर म्हणाले की, हेल्मेट परिधान करण्याच्या साध्या कृतीमुळे डोक्याला दुखापत होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो आणि अपघातात आपला जीव वाचू शकतो. त्यामुळे प्रत्येक रायडरने स्वतःच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.
सध्या महामार्गावर रहदारी वाढल्याने मोठ्या प्रमाणात अपघात वाढल्याचे दिसते. बऱ्याच अपघातांमध्ये चालकाने हेल्मेट परिधान न केल्यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे रस्ता सुरक्षेच्या मुद्द्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. या उपक्रमात आमच्या विद्यापीठाचा पुढाकार असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
–प्रा. डॉ. मंगेश कराड,
कुलगुरू तथा कार्याध्यक्ष,
एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे