पुणे : शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता. शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना अजित पवार गटाचे नेते दिलीप मोहिते पाटील यांनी जोरदार विरोध दर्शवला. राजकारणात सन्यास घेईन पण आढळरावांना साथ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने थेट अजित पवार यांनी नाराज मोहितेंच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. आता अजित पवार यांच्या विनंतीचा मान राखून मोहितेंनी आढळरावांना साथ देण्याचे मान्य केले आहे. शिरुरमधून आढळराव पाटील निवडून येतील, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे मोहिते यांनी म्हटले आहे. यामुळे शिवाजी आढळराव पाटील यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.
खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर बोलताना मोहिते म्हणाले, आज मी फक्त अजित पवार यांच्यामुळेच आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विनंतीचा मान राखणे महत्वाचे आहे. आमच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे एक पाऊल मागे घेत आहे. आता शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आढळराव पाटील असतील. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आढळराव पाटील आणि आमचा संघर्ष पराकोटीचा होता. कार्यकर्त्यांमध्ये आढळराव पाटलांसोबत जाण्यावर शंका होत्या. कार्यकर्त्यांच्या मनातील शंका कुशंका अजितदादांनी काढल्या. दादा २५ वर्षांत माझ्या घरी कधीच आले नव्हते. परंतु दादा आले. त्यांनी माझी समजूत काढली, असेही मोहिते म्हणाले.
दरम्यान, या वेळी झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक तास मार्गदर्शन केले. दिलीप मोहिते पाटील खमक्या माणूस असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीबाबत बैठकीत चर्चा झाली. आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश अगोदर होणार आहे. त्यापूर्वी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्याचे सांगितले होते, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. कोणतीही अडचण आल्यास मी जबाबदारी घेतो, असे अजित पवार यांनी या वेळी सांगितले.