लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट ते हडपसर या दरम्यानची हजारो झाडे जागविण्याचे काम मागील सात वर्षापासून कदंभ फाउंडेशन विनामूल्य करीत आहे. मात्र, या रस्त्याची डागडुजी करताना ठेकेदाराचे कामगार चक्क झाडांच्या बुंद्याशी डांबर टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे झाडांचे आयुष्य धोक्यात आले आहे.
यासंदर्भात कदंभ फाउंडेशनने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता एस.पी. नाईक यांच्याकडे झाडांच्या बुंध्यात डांबर टाकू नये, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. त्यानंतर नाईक यांनी सदर ठेकेदाराशी संपर्क साधून तंभी देऊन कामगारांना सूचना दिल्या आहेत.
तसेच रस्तादुभाजकावर माती आणि डांबर टाकण्यास मनाई करण्यात यावी आणि टाकलेले डांबर, माती उचलून घेण्यास सांगण्यात यावे, जो पर्यंत डांबर व माती काडून घेत नाहीत, तो पर्यंत ठेकेदारांचे बिल अदा करू नये अशी विनंती कदंभ फाउंडेशनने निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी बोलताना कदंभ फाउंडेशनचे नितीन कोलते म्हणाले की, गेली सात वर्षापासून दुभाजकावर लावलेल्या झाडांची विनामोबदला निगा राखत आहे. मात्र ठेकेदार रस्ता दुरुस्तीचे काम करत असताना, दुभाजकावरती माती व डांबर टाकत आहेत. त्यामुळे झाडांना पाणी देणे अशक्य होत आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर उपाययोजना करून लवकर मार्ग काढावा.