वडगावशेरी: पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर सोमनाथ नगर चौक ते खराडी जुना जकात नाक्या दरम्यानची बीआरटी काढण्यास महापालिकेने शनिवारी रात्रीपासून सुरुवात केली. सुरुवातीच्या टप्यात वाहतूककोंडीला अडथळा ठरणारी बीआरटी काढल्यानंतर टप्याटप्याने उर्वरित मार्गावरील बीआरटी काढण्यात येणार आहे. बीआरटीमुळे वाहतूककोंडी तसेच, अपघात होत असल्याने बीआरटी मार्ग काढण्याची मागणी नागरिक, आजी-माजी आमदार वारंवार करत होते.
वाहतूककोंडी आणि सातत्याने होत असलेल्या अपघाताना कारणीभूत ठरणारी अर्धवट बीआरटी तत्काळ काढावी, अशी मागणी आमदार बापुसाहेब पठारे तसेच माजी आमदार सुनिल टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे वारंवार केली होती. त्यानंतर पवार यांनी लगेचच महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना ही बीआरटी काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने शनिवारी (दि. १२) अर्धवट बीआरटी काढण्यास सुरुवात केली. सोमनाथनगर ते खराडी जुना नाका हे जवळपास तीन किमीचा बीआरटी मार्ग आहे. पहिल्या टप्प्यात सोमनाथनगर चौक आणि खराडी बायपास चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारा बीआरटी मार्ग आणि बस स्टॉप हटविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा मार्ग काढल्यानंतर पुढच्या टप्यात उर्वरित बीआरटी मार्ग काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
श्रेयवादासाठी आजी-माजी आमदारांची चढाओढ
आपल्या पाठपुराव्यामुळेच बीआरटी मार्ग काढण्यात येत असल्याचे नागरिकांना दाखवण्यासाठी आजी माजी आमदारांकडून सोशल आमदाराकडून मीडियावर श्रेय घेण्याचे युद्ध सुरू आहे, कार्यकर्ते तशा पोस्ट फॉरवर्ड करत आहेत.