पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न सोडवण्यासाठी अखेर मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 354 पदे भरण्याची प्रक्रिया वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने सुरू केली असून आतापर्यंत 30 हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

सध्या ससून रुग्णालयात उपलब्ध कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. या पार्श्वभूमीवर ही भरती होत असल्याने कर्मचारीवर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

या भरतीत कक्षसेवकांची सर्वाधिक 168 पदे असून, आया 38, सेवक 36, पहारेकरी 23, शिपाई 2, क्ष-किरण सेवक 15, हमाल 13, रुग्णपटवाहक 10, सहायक स्वयंपाकी 9, नाभिक 8, स्वयंपाकी सेवक 8, प्रयोगशाळा सेवक 8, बटलर 4, दवाखाना सेवक 4, माळी 3, प्रयोगशाळा परिचर 1, भांडार सेवक 1 आणि गॅस प्रकल्प चालक 1 अशी पदे भरण्यात येणार आहेत.

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 15 ऑगस्टपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत आहे. या भरती प्रक्रियेची जबाबदारी आयबीपीएस (IBPS) कंपनीकडे सोपवण्यात आली आहे.
ससून रुग्णालयात अनेक वर्षांनंतर सरळसेवा भरती होत आहे. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागत असून अंतिम मुदतीपर्यंत अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या भरतीतील प्रत्येक संवर्गासाठी सामाजिक आरक्षण लागू करण्यात आले आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी निश्चित केलेली वेतनश्रेणी 15 हजार ते 47 हजार 600 रुपये इतकी आहे. त्यामुळे या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार असून रुग्णालयाच्या कामकाजातही गती येणार आहे.







