पुणे : पुण्यात वाहतुकीच्या नियमांना काही वाहनधारक बगल देतात. त्यामुळे पुणे पोलिसांनी शंभर आणि पन्नास पेक्षा जास्त वेळा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर त्यांचे परवाने देखील रद्द केले जाणार आहेत. अशातच आता पुणे पोलिसांनी आणखी एक पाऊल उचलले आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पाच मिनिटांत दंडाची पावती त्या वाहनचालकाच्या मोबाइलवर फोटोसह जाणार आहे. यासाठी पोलिस आता थेट इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम या प्रणालीद्वारे कारवाई करणार आहेत. एआय तंत्रज्ञान आधारित ही यंत्रणा असणार आहे. त्यासाठी पोलीस ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नेशन कॅमेऱ्याची मदत घेणार आहेत.
पुणे पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर सर्वेक्षणास सुरुवात केली असून लवकरच सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सद्यस्थितीला शहरात स्मार्टसिटीचे ४३० आणि गुन्हे संदर्भातील १ हजार ३४१ कॅमेरे कार्यरत आहेत. वाहतूक विभागाकडील अपुरे मनुष्यबळ, वाहतूक नियमन यासह विविध कामांमुळे अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलिसांना मर्यादा येतात.
दुसरीकडे नियंत्रण कक्षातून कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करताना एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष ठेवता येत नसल्यामुळे पोलिस सिग्नलवरील कॅमेऱ्यांचा प्रभावी वापर करून ही स्मार्ट यंत्रणा लागू करण्याच्या विचाराधीन आहेत. शहरातल्या चौका चौकात आधुनिक कॅमेऱ्याद्वारे पुणे पोलिसांची यंत्रणा राबणार आहे.
एआय तंत्रज्ञानामुळे कोणी वाहतुकाचा नियम मोडला, तर तत्काळ पुणे पोलिसांना कळणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर पाच मिनिटांत फोटोसह पावती येणार आहे. त्यामुळे पुणे शहरात वाहन चालवताना नियमांचे पालन करावेच लागणार आहे. अन्यथा दंड भरावा लागणार आहे. तसेच सतत नियम मोडणाऱ्यां वाहनधारांकावर परवाना रद्द करण्याची करवाई केली जाणार आहे.