पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसर औद्योगिक नगरी म्हणून विकसित झाल्यामुळे कंपन्यांचे जाळे विस्तारले आहे. शहर विकसित झाल्यामुळे चोरी, दरोड्यांच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. परिसरात रात्रीच्या वेळी चोऱ्या करणाऱ्या टोळीला चिखली पोलिसांनी अटक केली असून, या टोळीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. आरोपींकडून २४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी अब्दुल कलाम रहिमान शहा, योगेश तानाजी चांदणे, रविशंकर महावीर चौरसिया, रिजवान खान आणि शकील मंसूरी या आरोपींना अटक करण्यात आले आहे. या टोळीत दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण एमआयडीसीसह भोसरी एमआयडीसीमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. चोरीच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर चिखली पोलिसांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. या पथकाने दिघी, म्हाळुंगे आणि चिखली परिसरातील कंपन्यांमध्ये झालेल्या चोरीचा शोध घेण्यासाठई या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, एकाच टोळीने ही चोरी केल्याचे उघडकीस आले.
तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी दिवसा एमआयडीसी परिसरात बंद असलेल्या कंपनीची रेकी करून रात्री चोरीचे नियोजन करायचे. जास्त घबाड हाती लागावे, या उद्देशाने हे आरोपी कंपनीतील महागडे तांबे असलेल्या मटेरियलची चोरी करायचे. हे मटेरियल कंपनीच्या बाहेर आणून ठेवल्यानंतर ते टेम्पोमधून घेऊन जायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी विकायचे. यामधून त्यांना लाखो रुपये मिळत असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
दरम्यान, पोलीस अब्दुल कलाम रहिमान शहा यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचल्यानंतर त्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाला. आरोपींवर चिखली पोलीस ठाण्यासह दिघी, चाकण, कोंढवा आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली.