पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर याना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने दुसऱ्या यादीत रवींद्र धंगेकर यांच्या नावाचा समावेश केला आहे. रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात भाजपने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे हे देखील महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेसाठी इच्छुक होते.
मात्र रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर वसंत मोरे आता नेमकं काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आता वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. “वसंत मोरेचा राम राम कुठपर्यंत पोहोचलाय… याचा थोडा अभ्यास करा खासदार तर मीच होणार…” अशी पोस्ट वसंत मोरे यांनी केली आहे. त्यांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत
वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वसंत मोरे म्हणतात, “कुठपर्यंत पोहोचला राम राम…गेली 21 वर्ष मी सातत्याने श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जात असतो. नेहमीप्रमाणे आजही सकाळी मी नारायणपूरला गेलो आणि दर्शन झाल्यानंतर मी त्या ठिकाणी मंदिरा बाहेर बसणाऱ्या भिक्षुक लोकांना सातत्याने काही दक्षना देत असतो. पैकी एका बाबांनी मला एक पेपरचे कात्रण दिल आणि मला बोलले मी तुमची आज वाटच बघत होतो. ही घ्या तुमची बातमी म्हणजे वसंत मोरेचा राम राम कुठपर्यंत पोहोचलाय… याचा थोडा अभ्यास करा खासदार तर मीच होणार…”