Ravindra Chavan पुणे : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचा फोटो काढून तो अॅपवर अपलोड केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची तत्काळ दखल घेऊन दुरुस्ती केली जाणार आहे. बांधकाम विभागाने या संदर्भात अॅपविकसित केले असून, तीन दिवसांपासून ते महिनाभरात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात येणार आहेत.
अॅपद्वारे मोबाइलवरून तक्रारी करा…!
केंद्र सरकारच्या ‘एम सेवा अॅप’मध्ये नागरिकांना खड्ड्यांविषयी तक्रारी करता येणार आहे. बांधकाम विभागाच्या सिटिझन विभागात ही सेवा उपलब्ध केली आहे. ‘पॉटहॉल कम्प्लेंट रिड्रेसेल सिस्टीम’ (पीसीआरएस) या अॅपद्वारे मोबाइलवरून तक्रारी करता येणार आहे. रस्त्यावरील खड्ड्याचे मोबाइलवर फोटो काढून ते अॅपवर अपलोड करून त्याबाबत नागरिकांना तक्रार करता येणार आहे. हे अॅप लवकरच ‘गुगल प्ले स्टोअर’वरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावरील सूचना, तक्रारींवर कार्यवाहीची सूचना संबंधित विभागाच्या कनिष्ट अभियंत्याला दिली जाईल. खड्डे दुरुस्तीनंतर संबंधित तक्रारदारास संदेशही जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
बांधकाम विभागांतर्गत पुणे प्रादेशिक विभागाची आढावा बैठक मंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बी. एन. बहीर, सातारा मंडळाचे एस. बी. रोकडे, सोलापूर मंडळाचे एस. एस. माळी, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, पुणेचे अधीक्षक अभियंता एस. एम. चिखलीकर, कोल्हापूर मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता एस. आर. पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान मंत्री चव्हाण यांनी रस्त्यांच्या स्थितीचा, खड्डे भरण्याच्या कामांचा, इमारतींच्या कामाचा आढावा घेतला. सुरू असलेल्या सर्व कामांची ‘जिओ टॅग’ केलेली छायाचित्रे बांधकाम विभागाच्या ‘पीएमआयएस’ प्रणालीवर वेळच्या वेळी अधिकाऱ्यांनी अपलोड करावीत. यंत्रणेत पारर्शकता येण्यासाठी ऑनलाइन प्रणालीमध्ये नियमित माहिती भरावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. या वेळी मुख्य अभियंता चव्हाण यांनी रस्त्यांसह इतर कामांचा आढावा घेतला. ‘पीएमआयएस’मध्ये जनतेला ‘व्ह्यू राइट’ देण्याबाबत सुधारणा करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, नागरिकाच्या तक्रारीची अंमलबजावणी न केल्यास सात दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तरीही दखल न घेतली गेल्यास महिनाभरात तो खड्डा बुजवून मुख्य अभियंत्यांनी संबंधिताची तक्रार दूर करणे अपेक्षित आहे. या प्रत्येक हालचालीवर मंत्रालयातून लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिकांनी खड्ड्यांचे छायाचित्र अॅपवर डाउनलोड करताना त्यांचे ‘जीपीएस’ कार्यान्वित ठेवणे अपेक्षित आहे, अशी माहिती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.