पुणे : राज्यात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर पुण्यासह ठाण्यामध्ये काही रुग्ण सापडले होते. आता जेएन.१ चे राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ११० वर पोहोचली असून, त्यातील तब्बल ९१ रुग्ण पुण्यात आहेत. रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून, चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यात मागील २४ तासांत जेएन.१ च्या ७२ रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. जेएन.१ चे गुरुवारी पुण्यात ७२ आणि नांदेड २, सोलापूर १, नागपूर १ असे ७८ नवीन रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. राज्यातील जेएन.१ च्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्क्यांहून अधिक पुण्यात आहेत. पुण्यातील ही रुग्णसंख्या ९१ वर पोहोचली आहे.
जेएन.१ चे ठाण्यात ५ रुग्ण असून, बीड ३, छत्रपती संभाजीनगर २, नांदेड २, कोल्हापूर १, अकोला १, सिंधुदुर्ग १, नाशिक १, सातारा १, सोलापूर १, नागपूर १ अशी रुग्णसंख्या आहे. दरम्यान, पुण्यात गुरुवारी कोरोनाचे १५ नवीन रुग्ण आढळले.
दरम्यान, राज्यात मागील २४ तासांत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा यामध्ये समावेश असल्याची माहिती मिळत आहे. कोल्हापूरमधील मृत्यू ३ जानेवारीला खासगी दवाखान्यात झाला असून, त्याचे वय १०१ वर्षे होते. तसेच त्या रुग्णाला हृदयरोग होता. त्याने कोरोना लशीची मात्रा घेतली नव्हती. तर सोलापूरमधील मृत्यू ३१ डिसेंबर रोजी खासगी दवाखान्यात झाला असून, त्या रुग्णाचे वय ७३ वर्षे होते. या व्यक्तीने कोरोना लशीच्या दोन मात्रा घेतल्या होत्या.
याविषयी बोलताना आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. आर. बी. पवार म्हणाले की, राज्यात १ ते २८ डिसेंबर २०२३ या कालावधीतील आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात आले. त्याचा अहवाल ३ जानेवारीला मिळाला असून, त्यात ७८ जणांना जेएन.१ चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.