Pune: पुण्यात तरुणीवर होत असलेल्या बलात्काराचे सत्र सुरुच आहे. स्वारगेट बस डेपोमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती, दरम्यान, पुण्यातील आणखी एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हि घटना घडली असून या प्रकरणी आरोपी सिद्धांत रणधीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेला वीस दिवस उलटूनही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही अशी माहिती समोर आली आहे. आरोपी पिडीतेच्या ओळखीतील असून ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. दरम्यान, अत्याचार केल्यानंतर पिडीतेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीकडून देण्यात येत होती. अखेर या त्रासाला कंटाळून पिडीतेने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला परंतु घटनेला 20 दिवस उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.

या घटने प्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून तो 26 फेब्रुवारीला भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीचा फोन बंद असल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक करू असे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपी तरुणीला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे, त्यानुसार आरोपी विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. आरोपीला अटक करून प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे, असे भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी सांगितले आहे.








