ओमकार भोरडे
रांजणगाव गणपती: रांजणगाव गणपती येथे आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असुन या ठिकाणी अनेकवेळा चोऱ्या तसेच इतर प्रकार घडत असतात. परंतु रांजणगाव एमआयडीसी मध्ये असलेल्या एका गोडाऊनची भिंत पडली अन् तीन तासात एक नव्हे दोन नव्हे तर चक्क 392 साखरेची पोती चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
भिंत कोसळून पोती बाहेर रोडवर पडली
याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 10 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री साडेदहा ते दि 11 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान रांजणगाव एमआयडीसी मधील पिव्हीसन्स कंपनी जवळील अग्रवाल यांचे साई इंदुसप्रो प्लैटीनम नावाचे गोडावुन (ता. शिरुर, जि. पुणे) येथे नॅशनल बल्क हँडलींग कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ताब्यात सणाऱ्या गोडावुन मधील रचलेली पोती अचानक ढासळुन बाजुच्या भिंतीवर पडली. त्यामुळे ती भिंत कोसळून पोती बाहेर रोडवर पडली.
392 साखरेची पोती चोरली
त्यामुळे रोडने येणाऱ्या-जाणाऱ्या अज्ञात लोंकानी त्या ठिकाणावरुन 50 किलो वजनाची एकुन 392 साखरेची पोती (प्रति किलो 37.50 रुपये) किमतीचा एकुण 7 लाख 35 हजार रुपयांचा माल रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या अज्ञात लोकांनी चोरुन नेला असल्याची फिर्याद अक्षय कोंडीराम कटके (वय 24) रा. इंदीरा चौक, निलंगा, ता. निलंगा जि. लातुर यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला दिली आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.