पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य सन्मान राखणे हे गरजेचे आहे.महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी आता पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या शिवाजीनगर परिसराचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे करण्यात यावे, अशी मागणी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शासनाला केली आहे. त्यांच्या या मागणीवर आता शासन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील शिवाजीनगर हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात असून सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. येथे अनेक लोकप्रतिनिधी आणि मान्यवर राहतात. या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नाव देण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शिवाजीनगर परिसराचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करण्यात यावे अशी पीठासीन अधिकारी असलेल्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासनाला विनंती केली आहे.
राज्यात अनेक शहरांची आणि ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. अशातच आता पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या शिवाजीनगर परिसराचे नाव बदलण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापतींनी केली आहे. दरम्यान पुणे शहरातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज नगर नाव देण्यात यावे,या मागणीसाठी यापूर्वी शिवप्रेमी संघटनाच्या वतीने पदयात्रा आणि मोर्चे काढण्यात आले होते.त्यावेळी मेट्रो अधिकारी यांनी नामांतरच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देखील दिला होता. मात्र अद्याप त्यावर कोणताही ठोस कारवाई झालेली नाही.