पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यात अल्पवयीन गुन्हेगारांचा असणारा सहभाग काळजीचा विषय ठरत असून यावर तोडगा म्हणून पुणे पोलिसांनी अल्पवयीन गुन्हेगारांना रोखण्यासाठी थेट पालकांवर गुन्हा दाखल करण्याचे धोरण अमलात आणले आहे. दि. ९ रात्री उशिरा रामटेकडी येथे टोळक्याने दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून एका तरुणाचा सिमेंट ब्लॉक, दगडाने ठेचून खून केला होता, या प्रकरणी अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेतल्यानंतर थेट गुन्हेगाराच्या आईवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सविता विकास शिंदे( रामटेकडी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत टोळक्यातील सर्व ६ अल्पवयीन आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन गुन्हेगाराच्या आईवर गुन्हा दाखल केला असून यापुढे कोणी अल्पवयीन गुन्हेगाराने कायदा हातात घेतल्यास त्याचे परिणाम त्यांच्या पालकांना परिणाम भोगावे लागतील असा संदेश दिला गेला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मयत राजू शिवशरण रामटेकडी वंदेमातरम चौक येथून जात असताना अल्पवयीन आरोपींनी शिवशरण यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते, परंतु राजू यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगारांनी सिमेंट ब्लॉक, दगडाने शिवशरण यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याचा खून केला होता.
याप्रकरणी अल्पवयीन गुन्हेगारांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राजू शिवशरण यांच्या नातेवाईकांनी केली. वानवडी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी थेट अल्पवयीन गुन्हेगारांच्या आईवर गुन्हा दाखल केला असून बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
सदरची कारवाई ही मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, आर राजा, पोलीस उप-आयुक्त सोो, परिमंडळ ०५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर व संजय पतंगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, संजय आदलिंग, व पोलीस अंमलदार अतुल गायकवाड, महेश गाढवे, सर्फराज देशमुख, दाऊद सय्यद, संदीप साळवे, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, यतीन भोसले, सोमनाथ कांबळे, गोपाल मदने, अमोल पिलाणे या विशेष पथकाने केली आहे.