संतोष पवार
पुणे : पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे विद्यमान उपाध्यक्ष रामराव पाडुळे यांची महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. सोलापूर येथे पार पडलेल्या मुख्याध्यापक महामंडळाच्या कार्यकारणी निवडणूकीत पाडुळे यांची पुणे जिल्हा विभागीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. रामराव पाडुळे हे सुरुवातीला पळसदेव येथील पळसनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १९९२ ते १९९४ या कालावधीत उच्च माध्यमिक विभागात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते.
त्यानंतर १९९४ पासून त्यांना इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथील कमल विद्यालयात मुख्याध्यापक पदावर सेवा करण्याची संधी मिळाली तेव्हापासून ते आजतागायत सुमारे ३० वर्ष कमल विद्यालयात मुख्याध्यापक पदाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळत आहे.स्वतः कबड्डी खेळाचे राष्ट्रीय खेळाडू असल्याने क्रीडा क्षेत्रात अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवत पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. याशिवाय २०११ ते २०१७ या काळात त्यांनी इंदापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपदही सक्षमपणे सांभाळले आहे.
२०१४ ते २०१७ अखेर पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव तर २०१७ पासून आतापर्यंत जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, शिक्षक शिक्षकेत्तरांचे विविध प्रश्न मागण्या यांचा संघाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून शासन दरबारी त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम पाडुळे यांनी केले आहे.
तसेच इंदापूर तालुक्यातील विद्यार्थांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवणे, शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे आणि विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करून शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. मुख्याध्यापक महामंडळाने दिलेली पुणे विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत कार्यक्षमपणे आणि प्रामाणिकपणे सांभाळून शैक्षणिक प्रगतीचा आलेख चढता ठेवण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असल्याचे रामराव पाडुळे यांनी सांगितले.