अमिन मुलाणी
सविंदणे : शिरूर तालुक्याच्या बेट भागात अष्टविनायक महामार्ग सुरू झाल्यामुळे प्रवासी वाहतूक वाढली असून, अवैध धंद्यांना ऊत आला आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात टाकळी हाजी, कवठे येमाई जिल्हा परिषद गटात राजरोसपणे धाबे, हातभट्ट्यांवर किरकोळ दारूविक्री होत आहे. याबाबत पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
बेट भागात घोड नदी, कुकडी नदी व डिंभा उजवा कालव्याच्या पाणी व्यवस्थापनामुळे शेती सुजलाम् सुफलाम् झाली आहे. शेतीमुळे आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्यामुळे बेट भाग हा आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला. दुर्दैव म्हणजे समृद्धी आली त्या पाठोपाठ कुटुंबातील कर्त्या पुरुषांची व्यसनाधीनता वाढीस लागली. दारूच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
कवठे येमाई, मलठण, जांबूत, पिंपरखेड, टाकळी हाजी ही मोठी गावे आहेत. प्रत्येक मोठ्या गावात पाच ते सात तर लहान गावात दोन ते तीन किरकोळ हातभट्टी विक्रीची अनधिकृत दुकाने चोरून थाटली आहेत. टाकळी हाजी चौकीअंतर्गत पश्चिम भागात ७० ते ८० लोक अवैध दारूची विक्री करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
दरम्यान, मागील महिन्यात शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी पदभार स्वीकारला आहे. मात्र, अद्यापही अवैध धंद्यांना आळा बसलेला दिसत नाही. पोलीस प्रशासन अवैध धंद्यांच्या ठिकाणी कारवाईसाठी जाताना दिसतात. कारवाई केल्याचे दिसत नाही. या परिसरातून अनेक गावांना दिवसाढवळ्या टाकळी हाजी पोलीस चौकीसमोरून दारूची वाहतूक केली जात आहे. चिरीमिरी घेऊन सर्रास दारू विक्री होत असल्याचे नागरिकांकडून दबक्या आवाजात बोलले जात आहे.
अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारी बोकाळली
शालेय मुला-मुलींना रस्त्याने जाताना या मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे. गुन्ह्यांची संख्या या परिसरात वाढत चालली आहे. याचे उगमस्थान हे अवैध धंदेच आहेत. या भागात मोठी कमाई मिळत असल्याने अनेक पोलीस अधिकारी या भागात बदली करून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेक वर्षे चौकीला असलेले पोलीस व अधिकारी यांची बदली करण्याची मागणी जनतेमधून दबक्या आवाजात केली जात आहे. शिरूरचे नवीन पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हे सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघाला अवैध धंद्याची लागलेली कीड मुळासकट काढणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.