लोणी काळभोर : ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, सनई चौघड्या, टाळ मृदुंग आणि भजनाचा गजर, त्याचबरोबर रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम ॥ जय श्रीराम, ‘सियावर रामचंद्र की जय….’ अशा विविध जयघोषात लोणी काळभोर (ता.हवेली) येथील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात अयोध्येतील श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम सोमवारी (ता.२२) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला सुमारे ५० हजारांहून अधिक जणांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला महिला व तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जन्मभूमी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे राष्ट्रार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोमवारी करण्यात आली. त्यानिमित्ताने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रामदरा शिवालयात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तीन दिवस हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दिवाळीपेक्षाही मोठ्या थाटामाटात हा सोहळा पार पडला.
या सोहळ्यानिमित्त गावातील संपूर्ण रस्त्यांवर रांगोळी काढण्यात आली होती. लोणी काळभोर येथील दत्त मंदिरापासून सकाळी आठच्या सुमारास देवतांची भव्य मिरवणूक पारंपारिक पद्धतीने काढण्यात आली. ही मिरवणूक सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रामदरा शिवालयात पोहोचली. या मिरवणुकीदरम्यान तरवडी-रानमळा, केसकरवस्ती व वडकी येथील धनगर समाजबांधवांनी गजनृत्य सादर केले. ढोलाच्या तालावर पडणारे लयबद्ध पदन्यास पाहण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली होती.
देवतांची मिरवणूक रामदरा येथे पोहचल्यानंतर रामदरा शिवालयाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर रामदरा शिवालयात दुपारी 12 वाजता महाआरती महंत हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना सोहळा दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी संपन्न झाला. यावेळी भाविकांनी अक्षदा वाहिला. त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी लोणी काळभोर व परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. शाळेतील मुलींनीही यामध्ये सहभाग घेतला होता.
तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम
लोणी काळभोरमध्ये मागील तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये श्री काळभैरव अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त रामायण, भजन, हरिपाठ, हनुमान चालीसा पठण, संगीतमय सुंदरकांड, रांगोळी, मिरवणूक, महाआरती, महाप्रसाद व दीपोत्सव आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
भजनी मंडळांचे भजन अन् प्रासादिक दिंडीही
श्रीराम मंडळ, श्रीमंत अंबरनाथ महिला भजनी मंडळ, श्रीराम महिला भजनी मंडळ, रामाकृषी भजनी, शंकर महाराज बाल भजनी मंडळ, भोसले नाना महिला भजनी मंडळ व तुकाई माता महिला भजनी मंडळ, रायवाडी भजनी मंडळांचे भजन झाले. तर श्रीमंत अंबरनाथ रामदरा शिवालय प्रासादिक दिंडी काढण्यात आली होती.
रस्त्यांवर रांगोळी, फटाक्यांची आतिषबाजी
दिवाळीपेक्षाही मोठ्या थाटामाटात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त गावातील संपूर्ण रस्त्यांवर रांगोळी काढण्यात आली होती. लोणी काळभोर येथील दत्त मंदिरापासून सकाळी आठच्या सुमारास देवतांची भव्य मिरवणूक पारंपारिक पद्धतीने काढण्यात आली. यावेळी मुलांनी मिरवणुकीमध्ये राम लक्ष्मण व सिताची वेशभूषा परिधान केली होती. तर महिलांनी डोक्यावर तुळशी कलश घेतला होता. पुरुषांनी लेझिम तर महिलांनी फुगड्या खेळत आनंद द्विगुणित केला. तसेच फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली होती. राम लक्ष्मण आणि सिताच्या मूर्तीला फुलांची आरास करण्यात आली होती. मंदिरही सुशोभित करण्यात आले होते.
सुमारे दोन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा
लोणी काळभोर येथील रामदरा शिवालयात तब्बल ५० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शनसाठी हजेरी लावली होती. तर लोणी काळभोर ते रामदरा शिवालयाच्या रस्त्यावर सुमारे दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
लोणी काळभोर पोलिसांचा चोख बंदोबस्त
लोणी काळभोर वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. तर लोणी काळभोर पोलिसांनी रामदरा शिवालय परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. तर सायंकाळी सहा ते रात्री आठपर्यंत रामदरा शिवालय व लोणी काळभोरमधील सर्व मंदिरात दीपोत्सव करून या सोहळ्याची सांगता झाली.