राहुलकुमार अवचट / यवत : वरवंड येथे गाईचे पूजन करीत महाराष्ट्र सरकारने देशी गायीला “राज्यमाता गोमाता” दर्जा दिल्याने आनंदोत्सव साजरा करत सरकारचे आभार मानले. विजयादशमीनिमित्त वरवंड पंचक्रोशीतील तरुणांनी एकत्रित येऊन दुर्गामाता दौड चे आयोजन केले होते. सकाळी ७ वाजता वरवंड येथील गोपीनाथ महाराज मंदिरापासून भगवा ध्वज हाती घेऊन जय श्रीराम, गोमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, अशा घोषणा देत दुर्गामाता दौडला सुरुवात झाली.
भगव्या ध्वजाचे ठिकठिकाणी औक्षण आणि स्वागत केले जात होते. दुर्गामाता मंदिर पासून यमाई माता मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर महाराष्ट्र सरकारने नुकताच ऐतिहासिक निर्णय घेऊन देशी गायीला “राज्यमाता गोमाता” दर्जा घोषित केल्याबद्दल वरवंड ग्रामस्थांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री दिवेकर यांनी गोमातेची पूजा करून महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.
तसेच समर्थ रामदास स्वामी क्रीडा मंडळचे अध्यक्ष संदीप टेंगले, दिशा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव टकले यांनी आपले मनोगत व्यक्त करत महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. दुर्गा माता दौड मध्ये वरवंड पंचक्रोशीतील तरुण युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला दिसून आले.