शुभम वाकचौरे
Rajgurunagar News : जांबूत : संवाद हा मनुष्यातील दुरावा दूर करतो. जीवनाच्या यशासाठी आपल्या आयुष्यात लोक जोडणे, सांभाळणे, जपणे फार महत्त्वाचे आहे. व्यक्ती व्यक्तीतील संबंध दृढ करण्यासाठी उत्तम संवादाची नितांत गरज आहे, असे ‘द वर्ड ऑफ हॅप्पी रिलेशन्स’ या संस्थेचे संस्थापक प्राध्यापक मुबीन तांबोळी यांनी सांगितले.
पुस्तकमैत्री बुक गॅलरीतील कार्यक्रमास चांगला प्रतिसाद
राजगुरुनगर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमामध्ये पुस्तकमैत्री बुक गॅलरी पुस्तकावर चर्चा या उपक्रमांतर्गत ‘मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा’ या पुस्तकावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. (Rajgurunagar News) या कार्यक्रमवेळी डॉ. अमोल वाघमारे, डॉ. राहुल जोशी, डॉ. निलम गायकवाड, कवयित्री मीनाक्षी पाटोळे, नामदेव पडदुने, नारायण करपे, मनोहर मोहरे, डॉ. सारिका भगत, शिवराम केंगले, सुवर्णा धाडवड, प्रा. जयश्री बगाटे, चंद्रकांत बोऱ्हाडे, कवी संदीप वाघोले, योगेश चव्हाण, साहेबराव पवळे, आमोद गरुड, संगीता लोहकरे, उषा वायाळ, अनुजा असवले तसेच डॉ. हनुमंत भवारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तांबोळी म्हणाले की, ‘स्वतःला शाबासकी द्यायला शिका, समोरच्या व्यक्तीला गृहीत न धरता महत्त्व द्यायला शिका, स्मित हास्यांनी बरेचसे प्रश्न सुटतात. समोरच्या व्यक्तीला काय अपेक्षित आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. (Rajgurunagar News) त्याचा उत्साह ओळखून त्याच्याशी वागायचा प्रयत्न करा. सुगंध देणं हा फुलाचा गुणधर्म आहे, ते कोणत्याही परिस्थितीत तो सोडत नाही. माणसाने तरी मानवता धर्म का सोडावा. दुसऱ्याचे मनापासून ऐकायचा प्रयत्न करा. समोरच्या व्यक्तीचं प्रामाणिकपणे कौतुक करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन पुस्तकमैत्री बुक गॅलरीच्या संचालिका मयुरी भवारी यांनी केले होते. तर सूत्रसंचालन प्रा. तृप्ती डावखर यांनी केले. डॉ. गणेश सोनवणे यांनी आभार मानले.