अरुण भोई
राजेगाव : राजेगाव (ता. दौंड) येथील राजेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने दहा टक्के लाभांश वाटप करण्यात आल्याने सभासद शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेला यावर्षी 44 लाख रूपये नफा झाला आहे. सलग 10-12 वर्षे लाभांश वाटप करणारी व बॅंक पातळीवर शंभर टक्के वसुली असणारी दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील एक अग्रगण्य संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते.
संस्थेच्या कार्यालयात नुकताच लाभांश वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी गटनेते मुकेश गुणवरे, मार्केट कमिटीचे संचालक भारत खराडे, संस्थेचे अध्यक्ष मधुकर जामले, उपाध्यक्ष भाऊ ढेंबरे, अमोल मोरे, नवनाथ लोंढे, महादेव बगाडे, भारत भोसले, गोविंद कडू, तानाजी थोरात, पीडीसीसी बॅंकेच्या राजेगाव शाखेचे विकास अधिकारी सचिन यादव, शाखा व्यवस्थापक हनुमंत काजळे, सचिव दत्तात्रय कोळेकर, सहसचिव अनिल खैरे, सर्व संचालक आणि सभासद शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर संस्थेने लाभांश वाटप केल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे. मिळालेल्या लाभांशाने ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या अडचणीतील शेतकऱ्यांच्या घरातील दिवाळी गोड होण्यासाठी थोडीफार मदत होणार असल्याने, त्यांना दिलासा मिळाला आहे.