पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे यांची ‘ नाटक आणि मी’ या विषयावर मुलाखत झाली, यावेळी त्यांनी मराठी भाषेतील कलाकारांना आदबीने वागण्याचा सल्ला दिला. “मी जेंव्हा इतर भाषेतील कलाकारांना भेटतो तेंव्हा ते एकमेकांना खूप आदराने हाक मारतात. मात्र, मराठी कलाकार एकमेकांसोबत त्या आदबीने वागताना दिसत नाही. एकमेकांना मान नाही दिला तर, प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील?” असा सवाल ही राज यांनी उपस्थित केला.
पूर्वी मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत अनेक सुपरस्टार होते. मात्र आता केवळ कलाकार राहिलेले आहेत. मराठी कालाकार एकमेकांशी बोलताना टोपण नावाने हाक मारतात. एकमेकांना मान दिला तर मराठी रंगभूमीला चांगले दिवस येतील असेही राज ठाकरे म्हणाले. फिल्म मेकिंग हे माझं पहिलं प्रेम, मात्र नाटकाबद्दल माझ्या मनात कायम कुतूहल आहे. चित्रपट, मालिका आणि नाटकं यामध्ये नाटक हे सर्वात आव्हानात्मक माध्यम आहे असे मला वाटते.
शंभराव्या नाट्य संमेलनात त्यांच्या मुलाखतीचा विषय ‘नाटक आणि मी’ऐवजी ‘मी केलेली नाटकं’ असा हवा होता, असं म्हणत मिश्किल टिपणी राज यांनी केली. नाटक न पाहीलेला मराठी माणूस सापडणे अवघड आहे. मराठ्यांचा इतिहास पाहिला तर तो नाटक ते अटक असा आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथेच मोठे झाले. आपण राज्यकर्ते होतो पण आपण आपला इतिहास विसरत चाललो आहोत असे राज ठाकरे म्हणाले.
अभिनेते दीपक करंजीकर यांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिन इटकर आदि मान्यवर संमेलनात उपस्थित होते.