Rain Update | पुणे : शहरासह राज्यात अवकाळी पावसाने दमजार हजेरी लावत चांगलेच झोडपून काढले आहे. उन्हाळ्यात उन्हाऐवजी पावसाळाच अधिक अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे पुढे पावसावर परिणाम होईल की काय चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. कारण यंदा भरघोस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विगाने वर्तविला आहे.
येत्या मान्सूनमध्ये अल निनो सक्रिय होणार असून, त्याचा पावसावर काही प्रभाव पडणार नाही. अल निनो असतानाही भारतात पाऊस पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व सामान्य नागरिकांनीही मान्सूनबाबत घाबरून जाण्याची गरज नाही, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
अवकाळी व वळवाच्या पावसाचा आणि मान्सूनच्या पावसाचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या महिनाअखेर अजून सुधारित अहवाल हवामानशास्त्र विभाग जाहीर करणार आहे. त्यावर पावसाचा नक्की अंदाज समजणार आहे. अल निनोचा प्रभाव असतानाही यापूर्वी चांगला पाऊस झाल्याचे निरीक्षण आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी एक वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाने जमीन खूप तापत असते. चक्रीय वात स्थिती निर्माण होते आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तापलेल्या जमिनीवर ढग तयार होतात आणि मग पाऊस पडतो. त्याला अवकाळी अथवा वळीव म्हटले जाते. दरवर्षी उन्हाळ्यात असा पाऊस पडणे नॉर्मल आहे.