पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात कॉपीराईट कायद्याचा भंग करुन मीठाची विक्री करणार्या एका दुकानदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई हडपसर येथील विठ्ठल मंदिराशेजारील बालाजी ट्रेडर्स या दुकानात रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबत साजीद असगरअली अन्सारी (वय ३४, रा. स्पाईन रोड, भोसरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हिराराम गंगाराम चौधरी (वय २६, रा. सोलापूर रोड, हडपसर) आणि नरेंद्रसिंग याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साजीद अन्सारी यांना हडपसरमध्ये टाटा नमकच्या नावाने दुसरे मीठ विकले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार फिर्यादींनी पाहणी केली असता बालाजी ट्रेडर्स या दुकानातून भेसळयुक्त टाटा मिठाची विक्री केली जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती.
त्यानुसार पोलिसांनी बालाजी ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना २० पोत्यांमध्ये टाटा नमक (मीठ) चे ६०० एक किलोच्या पुड्या आढळून आल्या. पोत्यामधील मिठाचे पाकिटावरील कव्हर व त्याचे अक्षराचे फॉन्ट पूर्णपणे वेगळे दिसून आले. तसेच त्याच्यावर बॅच नंबर देखील नव्हते.
ही सर्व पाकिटे पूर्णपणे कॉपीराईटचा भंग करुन बनविल्याचे आढळून आले. त्याची विक्री करुन कॉपीराईटचे हक्काचे उल्लंघन करीत असताना दुकानदार मिळून आला. याबाबत हिरामराम चौधरीकडे चौकशी केल्यावर त्याने नरेंद्रसिंग याच्याकडून ही पाकिटे घेतल्याचे सांगितले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशिल लोणकर करत आहेत.