लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर व लोणीकंद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी दारू तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या दोन ठिकाणी गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 2 लाखांचा मुदेमाल जप्त केला असून दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (ता. 21) हि कारवाई करण्यात आली आहे.
शितल गणेश परदेशी (वय 23, रा. मोलाई चौक, पेरणे, ता. हवेली) व मंगल संगम आडगळे (वय 45, रा. समतानगर, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन महिलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार पुणे शहर पोलीस ठाण्याच्या लोणी काळभोर लोणीकंद परिसरात अवैध धंदे प्रतिबंधक गस्त घालीत होते. यावेळी ऋषीकेश व्यवहारे व ऋषीकेश ताकवणे यांना त्यांच्या एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, पेरणे ते डोंगरगाव रोडवर एक महिला भट्टी लावून दारू तयार करीत आहे.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला असता शितल परदेशी हि तीच्या घराच्या मागे भट्टी लावून दारू काढत असताना दिसून आली. तिच्याकडून पोलिसांनी 140 लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू व अडीच हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात शितल परदेशी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समतानगर मंगल संगम आडगळे हिच्याकडे 35 लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू व रोख रक्कम असा 5 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मंगल आडगळे हिच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी युनिट 6 चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, संभाजी सकटे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, बाळासाहेब तनपुरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे या पथकाने केली आहे.