थेऊर, (पुणे) : मांजरी खुर्द गावच्या हद्दीत गोदरेज बांधकाम साईटजवळ ओढ्यालगत गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. सोमवारी (ता. 16) हि कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलिसांनी 35 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, 4 हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा 1 लाख 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बन्सीलाल शांतीलाल कर्मावत (वय – 50 रा. उंद्रे पेट्रोल पंपासमोर मांजरी ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे युनिट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना मांजरी खुर्द गावच्या हद्दीत गोदरेज बांधकाम साईटजवळ ओढ्यालगत गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. सदर ठिकाणी पथकाने अचानकपणे छापा घातला.
यावेळी सदर ठिकाणी 35 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व 4 हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 18 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी सदर भट्टी चालकाबाबत माहिती घेतली असता सदर भट्टी ही बन्सीलाल कर्मावत हा लावत असलेबाबत माहिती पोलिसांना मिळाली. कर्मावतच्या विरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (इ) व (फ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण युनिट -6 यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर ऋषीकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, नितीन धाडगे यांनी केली आहे.