Dilip Walse Patil : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसेपाटील तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून सक्रिय राजकारणात प्रवेश करत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील या सध्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुर्वा वळसे-पाटील यांच्यावर कोणती जबाबदारी देतात की त्यांनाच मैदानात उतरविणार, याबाबत आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (Dilip Walse Patil Vs Amol Kolhe)
राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असून, राजकीय डावपेच लक्षात घेता दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार पूर्वा वळसे पाटील यांनीही तालुका दौरे वाढवले असून लहान-मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी पक्षाचे नेते शरद पवार यांची साथ सोडत अजित पवारांबरोबर जाणे पसंत केले. यामुळे दिलीप वळसे पाटील यांना सहकारमंत्रिपद मिळाले. तसेच बुलडाणा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे ते राज्याच्या राजकारणात गुंतले असताना त्यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी गेल्या काही दिवसांत आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात दौरे सुरु केले आहेत.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचीही या मतदार संघात मोठी ताकद आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील किंवा पूर्वाताई वळसे पाटील यांना संधी मिळाल्यास आढळराव पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील किवा पूर्वीताईंच्या मागे मोठी ताकद उभी करतील, अशी चर्चा रंगली आहे.