पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक १३८ शाळा, माध्यमिक १८ आणि बालवाडीच्या २०३ शाळा कार्यान्वित आहेत. त्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना गतवर्षीपासून डीबीटीद्वारे साहित्य वाटप सुरू झाले. त्यापैकी मागील करारनाम्याप्रमाणे शालेय गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटर हे साहित्य पुरवठाधारांकडून खरेदी करून दिले जाते. आगामी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी गणवेश खरेदी करण्यास आणि त्यासाठी आवश्यक सुमारे २९ कोटींच्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
शालेय वर्षे सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश, पी. टी. गणवेश, स्वेटर, शालेय वह्या, दप्तर, रेनकोट, शूज, भूगोल व चित्रकला वह्या, विविध अभ्यासक्रमाची पाठपुस्तके असे शालेय साहित्य मोफत दिले जाते. मागील वर्षापासून शालेय साहित्यासाठी प्रशासनाने डीबीटीचा अवलंब केला आहे. परंतु, गणवेश, पी. टी. गणवेश स्वेटर हे साहित्य शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना झालेल्या करारातील अटी व शर्तीनुसार आणि पुणे दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित तीन ठेकेदारांकडून खरेदी केले जाते. त्याप्रमाणे महालक्ष्मी ड्रेसेस अँड टेलरिंग फर्म, श्री प्रेस्टीज गारमेट्स अँड टेलरिंग फर्म आणि श्री वैष्णवी महिला कॉर्पोरेशन यांच्याकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी शालेय गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटर खरेदी करून वाटप करण्याचा निर्णयास आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली.
पालिकेच्या प्राथमिक विभागाने शालेय गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटर खरेदीसाठी आगामी वर्षाच्या मूळ अर्थसंकल्पात एकूण २२ कोटी ६८ लाख ५२ हजार रुपये इतकी तरतूद करावी, अशी मागणी केली आहे. तर, माध्यमिक विभागाने या खरेदीकामी ७ कोटी इतकी तरतूद करावी, अशी मागणी केल्याचे शिक्षण विभागाच्या प्रस्तावात आहे. त्यानुसार गणवेश खरेदीवर आगामी वर्षात सुमारे २९ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.