पुणे : पुण्यात दिवाळी उत्साहात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. मात्र, फटाक्यांच्या आतषबाजीने शहर आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. काही भागातील हवा तर धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे श्वसनास त्रास होण्यासह आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
धुलिकणांचे हवेतील प्रमाण वाढल्यावर हवेची गुणवत्ता बिघडते. फटाके, बांधकामे अशा विविध कारणांनी हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. शुक्रवारी रात्रीच लक्ष्मीपूजनानंतर शहर आणि उपनगरांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक ११५च्या पुढे गेला होता. हवेच्या गुणवत्ता निकषानुसार ५० पर्यंत निर्देशांक असल्यास हवेची गुणवत्ता निर्धोक मानली जाते.
तसेच समाधानकारक स्तरात ५१ ते १०० पर्यंत निर्देशांक असल्यास हवेतील काही प्रदूषणकारी घटक त्रासदायक ठरण्याची शक्यता असते.. साधारण स्तरात १०१ ते २०० दरम्यान निर्देशांक असल्यास मुले आणि ज्येष्ठांना श्वसनाचा त्रास होतो. वाईट स्तरात २०१ ते ३०० या दरम्यान निर्देशांक असल्यास सर्वांवरच त्याचा विपरीत परिणाम होतो. अतिवाईट स्तरात ३०० पेक्षा जास्त निर्देशांक असल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.लक्ष्मीपूजनानंतर उडवलेल्या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. या धूरकट वातावरणाचा परिणाम शनिवारीही दिसून आला.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक पुढीलप्रमाणे :
शिवाजीनगर – २५४
भूमकरनगर – १७४
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – २९८
कर्वे रस्ता – २०९
हडपसर – २८१
लोहगाव येथील म्हाडा कॉलनी – १५४
पंचवटी – १९६