पुणे : पुणेकरांनो, तुम्ही पनीर विकत घेत असाल तर सावधान, कारण पुण्यात पुन्हा एकदा भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी भागात असणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. ६ सप्टेंबर रोजी मांजरी येथे झालेल्या कारवाईत देखील मोठ्या प्रमाणावर बनावट पनीर जप्त करण्यात आले होते.
वानवडीतील मे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे.या छाप्यात ८०० किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे. ३५० किलो स्किम्ड मिल्क पावडर व २७० किलो पामोलिन तेल साठा देखील आढळला आहे.
साठ्यातून तपासणीसाठी नमुने घेत किंमत १ लाख ६७ हजार ७९० रूपये किमतीचे ७९९ किलो पनीर, १ लाख २१ हजार ८०० रूपये किमतीचे ३४८ किलो स्किम्ड मिल्क पावडर, ३९ हजार ६६४ रूपये किमतीचे २६८ किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण ३ लाख २९ हजार २५४ रुपये किंमतीचा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला आहे.
नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. एकाच महिन्यात हा दुसरा छापा आहे. ६ सप्टेंबर रोजी मांजरी येथे झालेल्या कारवाईत देखील मोठ्या प्रमाणावर बनावट पनीर जप्त करण्यात आले होते.